

छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. जालना जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून वाळू माफियांचे कंबरडे पाडले. गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एकूण १ कोटी ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एकूण ११ वाहने (१ टिप्पर, १ विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ९ ट्रॅक्टर-ट्रॉली) तसेच ५१५ ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्वतः प्रत्यक्ष हजर राहून दोन ठिकाणी मोठी कारवाई केली. यामध्ये १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एलसीबी जालना आणि घनसावंगी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भेंडाळा शिवारातून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा 'भारत बेंझ' कंपनीचा हायवा टिप्पर (MH 21 CL 5455) पकडला. यात २० लाखांचा हायवा आणि २५ हजारांची वाळू, असा एकूण २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis