
अमरावती, 14 जून (हिं.स.)।अल्पवयीन मुलीसोबत संशयित युवक काही दिवसांपासून सतत संपर्कात असल्याची बाब पीडितेच्या पालकांच्या निदर्शनात आली. त्या आधारे पोलिसांनी संशयित मोहंमद शहीद मोहंमद इसराईल (वय २५) या युवकास अटक केली आहे. अंजनगावसुर्जी ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गत काही दिवसांपासून अल्पवयीन मुलगी सतत मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. पालकांनी मुलीला हटकले असता ती संशयित मोहंमद शहीद मोहंमद इसराईल याच्यासोबत बोलत असल्याचे निदर्शनात आले. शिवाय त्या दोघांमध्ये सोशल मीडियावरून चॅटिंगसुद्धा सुरू असल्याची बाब मुलीचा मोबाईल तपासला असता लक्षात आली. मुलीचा पाठलाग करून तू मला खूप आवडते, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे तो तिला म्हणत होता. काही दिवस बदनामीच्या भीतीपोटी पालकांनी कुणाकडे वाच्यता केली नाही. पालकांनी विचार करून संशयित मोहंमद शहीद याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही तो अल्पवयीन मुलीसोबत सतत बोलत असल्याचे पालकांच्या निदर्शनात आले.
मुलीच्या पालकांनी अंजनगावसुर्जी ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी संशयित मोहंमद शहीदविरुद्ध विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. युवतीला धमकी धारणी ठाण्याच्या हद्दीतील अन्य दुसऱ्या घटनेमध्ये युवती निवासस्थानी असताना संशयित ललित गुलाबराव मसराम याने पीडितेकडे जाऊन तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, मी तुला पळवून न्यायाला आलो, अशी धमकी संशयित ललित मसराम याने युवतीला दिली. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने तक्रार केली. धारणी पोलिसांनी संशयित ललित मसरामविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी