
अमरावती, 14 जून (हिं.स.)। पदोन्नतीद्वारे मोर्शी वन परिक्षेत्रात नियुक्ती मिळालेले सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व अतिक्रमण निर्मूलन) हे आपल्या अधिकृत नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहता अमरावती येथील मुख्य कार्यालयातूनच कामकाज करतात. त्यामुळे मोर्शी परिसरातील शेतकरी, वनहक्कधारक आणि सामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपवनसंरक्षकांना यासंदर्भात निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. डॉ. मयूर भैलूमे असे या सहायक वनसरंक्षकांचे नाव आहे. डॉ. भैलूमे यांनी मोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयात नियमित उपस्थित राहून कामकाज करणे बंधनकारक होते. मात्र, ते मोर्शीऐवजी अमरावती वन विभाग कार्यालयात बसूनच प्रशासकीय कामे पाहत आहेत. परिणामी, स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या लहान-सहान कामांसाठी व स्वाक्षऱ्यांसाठी नाहक आर्थिक भुर्दंड सहन करत अमरावतीचे हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी संबधित अधिकाऱ्याला तात्काळ मोर्शी येथे नियमित कर्तव्य बजावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अमित अढाऊ यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, दिनेश आमले, राजू वऱ्हाडे, कुंदन काळे, अनिल पावडे यांनी दिला आहे.
अतिरीक्त कार्यभार असल्यामुळे अमरावतीत माझी नियुक्ती मोर्शीत आहे, त्याचवेळी उपवनसरंक्षक (मेळघाट व्याघ्र प्रकल्प) हा अतिरीक्त कार्यभारसुध्दा आहे. त्यामुळे अमरावतीत कामकाज करतो. तसेच मोर्शी परिसरातील शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांचे विषय व इतरही प्रकरण आम्ही तातडीने निकाली काढतो. - डॉ. मयूर भैलूमे, सहायक वनसंरक्षक.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी