
अमरावती, 14 जून (हिं.स.)। देशाच्या विकासाचा खरा पाया शिक्षण असून धार्मिक पर्यटनाबरोबरच शिक्षण क्षेत्रालाही समान प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती दिपाली मनीष विधळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी शक्तीपीठांचे नव्हे, ज्ञानपीठांचे महामार्ग उभारा या विषयावर आपली भूमिका मांडताना विकासाच्या सध्याच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विधळे यांनी म्हटले आहे की, शक्तीपीठांना जोडणारे रस्ते आणि धार्मिक पर्यटनासाठी उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्याला शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठापर्यंत सहज पोहोचता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे अधिक गरजेचे आहे. शिक्षण ही खर्चाची बाब नसून भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांच्या मते, अनेक ग्रामीण भागांमध्ये आजही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिक्षक, वाचनालये आणि प्रयोगशाळांच्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विकासाची व्याख्या केवळ सिमेंटचे रस्ते, भव्य इमारती आणि धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित राहू नये. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा विकासच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरू शकतो.विधळे यांनी पर्यावरणीय प्रश्नांकडेही लक्ष वेधले. वाढते काँक्रीटीकरण, उष्णतेच्या लाटा आणि बदलते हवामान लक्षात घेता विकास प्रकल्पांमध्ये शाश्वत नियोजनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक बंद पडणारी शाळा म्हणजे एका गावाचे भविष्य अंधुक होणे आणि प्रत्येक रिकामे वाचनालय म्हणजे एका विद्यार्थ्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न असल्याचे नमूद करत त्यांनी शासन व धोरणकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.प्रत्येक गावात चांगली शाळा आहे का, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध आहे का आणि प्रत्येक तरुणाला उच्च शिक्षणाची समान संधी मिळते का, असे मूलभूत प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली.देवाकडे जाणारा मार्ग श्रद्धा दाखवतो; परंतु ज्ञानाकडे जाणारा मार्ग भविष्य घडवतो. राष्ट्राचे खरे वैभव भव्य इमारतींमध्ये नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये असते, असेही विधळे यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी