पुणे महापालिकेच्या निधीचे योग्य नियोजन न झाल्याने दोन कोटींचे व्याज बुडाले
पुणे, 14 जून (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध आर्थिक उपाययोजना केल्या जात असताना एका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे पालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपलेल्या ठेवींचे वेळेत नूतनीकरण
PMC news


पुणे, 14 जून (हिं.स.)।

पुणे महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध आर्थिक उपाययोजना केल्या जात असताना एका अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे पालिकेला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपलेल्या ठेवींचे वेळेत नूतनीकरण न करता त्या जवळपास महिनाभर बचत खात्यात पडून राहिल्याने हे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिकेच्या आर्थिक व्यवहारातील ही निष्काळजीपणा मानली जात असून त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या तिजोरीत शासकीय अनुदान, नागरिकांकडून वसूल होणारे कर तसेच ठेकेदारांच्या अनामत रकमांच्या स्वरूपात मोठा निधी जमा होत असतो. या निधीपैकी पाच हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवींच्या स्वरूपात गुंतविण्यात आली आहे.

मे महिन्यात एका मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर ती रक्कम तत्काळ नव्याने मुदत ठेवीत गुंतविण्याऐवजी बचत खात्यातच राहिली. परिणामी मुदत ठेवीवर मिळणारे जास्त व्याज पालिकेला मिळू शकले नाही आणि अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १,२५० कोटी रुपयांच्या पाच नवीन मुदत ठेवी ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. या घटनेनंतर महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रण आणि देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande