
रायगड, 14 जून (हिं.स.) : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत करावली (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र शिंदे आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील गजानन गावंड यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सुमारे ९ वाजता जेट्टी परिसरात काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेनंतर दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला आहे. तसेच जेएनपीटी प्रशासनाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पिगिंगसारख्या धोकादायक कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याबाबत कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हेल्मेट, गॅस टेस्टिंग आणि ‘परमिट टू वर्क’ प्रक्रियेचे पालन झाले नसल्याचा आरोपही काही संघटनांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर जेट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबविण्यात आले असून, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)