

विविध ब्रँडच्या नावाखाली एकाच उत्पादकाकडून पुरवठा होत असल्याचा आरोप
अमरावती, 15 जून (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या बॉटल व्यवसायात एक धक्कादायक प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये एकाच पाणी उत्पादक कंपनीकडून विविध हॉटेल्स, लॉन्स, मंगल कार्यालये, राजकीय कार्यक्रम तसेच खासगी समारंभांसाठी वेगवेगळ्या नावांच्या पाणी बॉटल्स छापून पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, बाजारात विविध ब्रँडच्या नावाने विकल्या जाणाऱ्या अनेक पाणी बॉटल्सच्या मागे प्रत्यक्षात एकच उत्पादन यंत्रणा आणि एकच FSSAI नोंदणी क्रमांक असल्याची चर्चा आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे का, तसेच अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन होत आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, कार्यक्रम आयोजक आणि व्यावसायिकांना त्यांच्या नावाने खास लेबल लावून पाणी बॉटल्स पुरवल्या जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ग्राहकांना त्या स्वतंत्र ब्रँडच्या असल्याचा भास निर्माण होतो. मात्र, उत्पादन एकाच ठिकाणी होत असल्यास आणि त्याबाबत आवश्यक नियमांचे पालन केले जात नसेल, तर हा प्रकार चौकशीचा विषय ठरू शकतो.
याशिवाय, अमरावती जिल्ह्यातील विविध एमआयडीसी क्षेत्रांसह काही ठिकाणी घरगुती स्तरावरूनही अशा बॉटल्सचा पुरवठा होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण साखळीची सखोल तपासणी करण्याची मागणी वाढू लागली आहे.
दरम्यान, या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अनेकदा तक्रारी झाल्याची चर्चा असली तरी, आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित विभागाने या व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अशातच, तुकाराम मुंढे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील पाणी बॉटल उत्पादन युनिट्स, त्यांचे परवाने, FSSAI नोंदणी, लेबलिंग नियम आणि पुरवठा साखळी यांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी आता जोर धरत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयात प्रशासनाने तातडीने तपास मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
“एकच पाणी, अनेक नावे आणि प्रशासनाचे मौन” हा मुद्दा आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, संबंधित यंत्रणा याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी