प्रवीण पोटे पाटील विक्रमी मतांनी विजयी होतील – रविंद्र चव्हाण
अमरावती, 15 जून (हिं.स.) अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनाची मोर्चेबांधणी अधिक वेगाने सुरू केली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे महायुतीच्या प्रमु
अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची रणशिंग फुंकली;


अमरावती, 15 जून (हिं.स.)

अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनाची मोर्चेबांधणी अधिक वेगाने सुरू केली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे महायुतीच्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी या बैठकीत सविस्तर रणनीती आखण्यात आली.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी प्रवीण पोटे पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळत असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला.

या बैठकीला भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे नेते व आमदार रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, सुरेखा ठाकरे तसेच शिवसेना (शिंदे गट)चे संतोष बद्रे यांच्यासह महायुतीतील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मतदानाचा दिवस जवळ येत असताना प्रत्येक मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संपर्क वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे प्रदर्शन घडवून आणणे यावर बैठकीत भर देण्यात आला. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठीचा अंतिम आराखडा अर्थात ‘फायनल गेम प्लॅन’ यावेळी निश्चित करण्यात आल्याने अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande