
अमरावती, 15 जून (हिं.स.)
भाजपचे राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी श्रीनगरमधील तिरंगा आणि कलम ३७०च्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत वादग्रस्त विधान केले आहे. वीस वर्षांपूर्वी श्रीनगरला गेलो तेव्हा तेथील स्तंभावर तिरंगा नव्हता. तिरंगा नसण्याचे कारण पंडित नेहरू होते, तर आज तिरंगा फडकण्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे बोंडे म्हणाले.कलम ३७० हटवण्याचे संपूर्ण श्रेय मोदी सरकारला देत, मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले नसते तर कलम ३७० हटले असते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीत झालेल्या बदलांचा उल्लेख करत, पूर्वी सैनिकांवर दगडफेक होत असे, शाळा आणि व्यवहार वारंवार बंद राहत असत तसेच लाल चौकात जाण्यावर निर्बंध होते, असे सांगितले. मात्र आता देशभरातील पर्यटक मुक्तपणे श्रीनगर आणि लाल चौक परिसरात फिरत असल्याचा दावा त्यांनी केला.डॉ. बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील तसेच राष्ट्रीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडून या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी