
* ८६ अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्या; रहिवाशांना पर्यायी निवास उपलब्ध करून द्या - 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल
मुंबई, 19 जून (हिं.स.) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जुन्या व अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी म्हाडाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली असून, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील पावसाळापूर्व सर्वेक्षणात घोषित करण्यात आलेल्या ८६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू व रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी दिले.
म्हाडा मुख्यालयात आज आयोजित पावसाळापूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मुंबई बेटावरील अतिधोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती तात्काळ रिकाम्या करून घेणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा संरचनात्मक उपाययोजना तातडीने सुरू करणे तसेच रहिवाशांना सुरक्षित पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
यावेळी मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार ८६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २२५६ निवासी व ४८० अनिवासी असे एकूण २७३६ भाडेकरू व रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, संरचनात्मक कमकुवतपणा आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता या सर्व नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत २९ भाडेकरू /रहिवासी मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. ३६ निवासी भाडेकरू रहिवासी यांनी स्वतःची निवार्यादची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. तसेच उर्वरित भाडेकरु / रहिवाशांना निष्कासनाच्या सुचना देऊन गाळे खाली करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. अशाप्रकारे मंडळाला २१२० निवासी भाडेकरु / रहिवाशांची संक्रमण शिबीरात व्यवस्था करावी लागणार असल्याचे सांगितले.
तसेच अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतीमधील भाडेकरु/रहिवाशी यांना अतिधोकादायक इमारतींच्या बाबतीत खबरदारी बाळगण्याचे सूचना फलक देखील लावण्यात आले असून मंडळाच्या अधिकार्यांळना कार्यवाही करतेवेळी सहकार्य करण्याचे देखील आवाहन करण्यात आले असल्याचे श्री शंभरकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत मंडळाकडे ७५० संक्रमण गाळे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना अतिरिक्त पर्यायी निवास उपलब्ध करण्यासाठी पर्यायांची सुविधा मंडळाकडे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बैठकीत श्री. जयस्वाल यांनी सांगितले की, रहिवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतीही बाब महत्त्वाची नाही. अतिधोकादायक इमारतींमधून स्थलांतरित होण्यासाठी मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी निवास व्यवस्थेला काही रहिवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच, जे रहिवासी स्वतःच्या स्तरावर पर्यायी निवासाची व्यवस्था करतील त्यांना मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र रहिवाशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
म्हाडाने पावसाळ्याच्या कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची तयारी केली आहे. अतिधोकादायक इमारतींची नियमित पाहणी, आवश्यक ठिकाणी संरक्षक उपाययोजना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसेच नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद या माध्यमातून जोखीम कमी करण्यावर भर दिला जात आहे.
मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडा कटिबद्ध असून, पावसाळ्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिले.
यावेळी मुंबई मंडळातील सर्व अभियंत्यांना उद्देशून ते म्हणाले की, अभियंत्यांनी मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई उपनगरातील सर्व विभागांमधील जुन्या व धोकादायक इमारतींची सखोल पाहणी करावी. आवश्यकतेनुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या व धोकादायक इमारतींबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनाबाबत नागरिकांना अवगत करावे.
तसेच त्यांनी मुंबईतील दरडप्रवण व डोंगर उतारांवर वसलेल्या झोपडपट्टी भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या संरक्षण भिंती (Retaining Walls) व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूस्खलन, दरड कोसळणे आणि माती घसरण्याच्या संभाव्य धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सतीश भारतीय यांच्याकडून जाणून घेतली.
श्री. भारतीय यांनी सांगितले की, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे एकूण ३९ संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली असून, मंडळातर्फे सुरक्षा व गुणवत्तेचे सर्व निकष पाळून त्यापैकी २८ कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ८ कामे प्रगतीपथावर असून तीही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयामार्फत ९७ संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली असून त्यापैकी ७२ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २५ कामांचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या संरक्षण भिंतींमुळे दरड कोसळण्याचा धोका कमी होऊन नागरिकांच्या जीवित व वित्तहानीपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी श्री. जयस्वाल यांनी या कामांची गुणवत्ता, प्रगती आणि वेळेत पूर्णत्व याबाबत आवश्यक सूचना देत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी