चंद्रपूरमध्ये प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी; शेती नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र धोरण समिती गठीत होणार
चंद्रपूर, 19 जून (हिं.स.) :चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग आणि कोल वॉशरीजमुळे निर्माण होणारी धूळ, हवेतील प्रदूषण आणि दूषित पाण्याचा शेती तसेच मानवी जीवनावर होणारा परिणाम प्रत्यक्ष पाहण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी गुरुवारी जिल्ह्
चंद्रपूरमध्ये प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी; शेती नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र धोरण समिती गठीत होणार


चंद्रपूर, 19 जून (हिं.स.) :चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा उद्योग आणि कोल वॉशरीजमुळे निर्माण होणारी धूळ, हवेतील प्रदूषण आणि दूषित पाण्याचा शेती तसेच मानवी जीवनावर होणारा परिणाम प्रत्यक्ष पाहण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी गुरुवारी जिल्ह्याचा दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी बेलसणी, भटाळी आणि उर्जानगर या प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबत धोरण व कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI) चे प्रतिनिधी सहभागी असतील. शास्त्रीय अभ्यास करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत निश्चित धोरण तयार केले जाणार आहे.

प्रदूषणावर शास्त्रीय अभ्यासावर भर

खारगे यांनी स्पष्ट केले की, उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा शेतीवर होणारा परिणाम, भरपाईचे निकष, दर आणि कालावधी याबाबत शास्त्रीय पद्धतीने निर्णय घेतला जाईल. यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करून सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाईल.

“शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च” – आमदार मुनगंटीवार

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, उद्योगांमुळे शेती आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. शेतकऱ्यांचे हित उद्योगांपेक्षा अधिक महत्त्वाचे असून नुकसानभरपाईसाठी तयार होणाऱ्या अहवालात किमान आधारभूत किंमत (MSP) धोरणाचाही विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

विविध ठिकाणांची पाहणी

दौऱ्यादरम्यान बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीमुळे होणारे प्रदूषण, भटाळी येथील वेकोलीच्या ओव्हरबर्डनमुळे निर्माण होणारा पुराचा धोका तसेच उर्जानगर परिसरातील प्रदूषण स्थितीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande