

रायगड, 19 जून (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन म्हसळा येथे सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, म्हसळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत म्हसळा नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. “सफाई कर्मचारी हे खऱ्या अर्थाने समाजाचे देवदूत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांचा सन्मान करणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे ते म्हणाले. शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास तालुकाप्रमुख तुकाराम चाळके, महिला आघाडीच्या निशा पाटील, निकेत कोसबे, गजु भटकर, अंकुश नटे, स्वानंद बोरकर, रेणुका मोरे, डॉ. माया बेलवडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कौस्तुभ करडे यांनी, “सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली अर्पण केली आहे. येणाऱ्या काळात शिवसेना म्हसळा तालुक्यात पूर्ण ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)