

रायगड, 19 जून (हिं.स.)। शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवा सेना माणगाव तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सौजन्याने ही रुग्णवाहिका रुग्णालयाला प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे तालुक्यातील रुग्णांना तातडीची आणि अधिक सक्षम आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या जनसेवेच्या वाटचालीचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आजही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण जनतेचे सेवेकरी म्हणून कार्यरत असल्याचे नमूद केले.
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून माणगाव तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नव्या रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचविणे शक्य होईल आणि त्याचा लाभ गरजू नागरिकांना निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर मंत्री गोगावले यांनी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. अतिदक्षता विभाग, औषधसाठा, वैद्यकीय सेवा तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत त्यांनी रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या कार्यक्रमास युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, ज्ञानदेव उतेकर, विपुल उभारे, युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय कर्मचारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)