
नांदेड, 19 जून (हिं.स.) :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या 11001/11002 नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्बा संरचनेत मध्य रेल्वेने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलानुसार ही गाडी आता आधुनिक LHB डब्यांसह चालवली जाणार असून सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मात्र, या निर्णयामुळे एकूण डब्यांची संख्या 18 वरून 16 करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले नॉन-एसी स्लीपर कोच 8 वरून 5 इतके कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
“जीवनवाहिनी” गाडीवर परिणामाची भीती
नंदिग्राम एक्सप्रेस ही मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची गाडी मानली जाते. नांदेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, आदिलाबाद, भोकर, हदगाव, पुसद आणि यवतमाळ परिसरातील हजारो प्रवासी रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी मुंबई, ठाणे, कल्याण व नाशिक परिसरात नियमित प्रवास करतात.
या मार्गावरील मोठ्या प्रवासी संख्येमुळे वर्षभर गाडीला प्रचंड गर्दी असते. विशेषतः सण, सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात आरक्षण मिळणे कठीण होते.
प्रवासी संघटनांची मागणी
प्रवासी संघटनांच्या मते, LHB डब्यांचा समावेश स्वागतार्ह असला तरी त्याचवेळी डब्यांची संख्या कमी करणे चुकीचे आहे. वाढत्या मागणीचा विचार करून 20 ते 25 डब्यांची रचना सहज शक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
त्याचबरोबर स्लीपर कोच कमी केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि मध्यमवर्गीय प्रवाशांवर मोठा परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, नंदिग्राम एक्सप्रेस ही केवळ एक रेल्वेगाडी नसून लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आधुनिकीकरणासोबतच प्रवासी क्षमतेत वाढ करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis