नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम; स्थलांतरित मजुरांसाठी 'आरोग्य साथी' प्रशिक्षण संपन्न
नांदेड, 19 जून (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी आपल्या कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. या स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना फडावरच तातडीने प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्
अ


नांदेड, 19 जून (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी आपल्या कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. या स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना फडावरच तातडीने प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आरोग्य साथी' हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नांदेड येथे 'आरोग्य साथी प्रशिक्षण पुस्तिका' आणि नियोजित आराखड्यानुसार 'आरोग्य साथी' प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

या विशेष आरोग्य शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी उपस्थित होत्या. प्रशिक्षण सत्रादरम्यान डॉ. सलमा हिराणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 'आरोग्य साथी' उपक्रमाची गरज आणि मजुरांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली. स्थलांतरादरम्यान मजुरांना भेडसावणारे विविध आजार, लहान मुलांचे व महिलांचे आरोग्य, कुपोषण, तसेच फडावरच द्यावयाचे प्राथमिक उपचार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला श्रीमती बेरलीकर (PHN - पब्लिक हेल्थ नर्स) व रफिक शेख (HA - हेल्थ असिस्टंट) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आरोग्य साथींना तांत्रिक व व्यावहारिक कामांविषयी मोलाचे धडे दिले.

या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील हदगाव, मुखेड आणि तुपा या भागांतून मोठ्या संख्येने 'आरोग्य साथी' (आरोग्य स्वयंसेवक) उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान 7 सर्व आरोग्य साथींना आरोग्याची काळजी घेणे, प्रथमोपचार किटचा वापर करणे आणि गंभीर परिस्थितीत रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात रेफरल सेवा कशी उपलब्ध करून द्यायची, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या विशेष उपक्रमामुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande