शुक्रवारपासून बीडमध्ये रंगणार भक्तीचा सोहळा
बीड, 25 जून (हिं.स.)। आषाढी वारीचे वेध लागताच अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. विठू नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि भगव्या पताक्यांच्या सावलीत संतांचा अथांग मेळा जेव्हा पंढरीच्या दिशेने कूच करतो, तेव्हा भक्तीचा एक अनोखा सोहळा डोळ्यांसमोर उभा र
शुक्रवारपासून बीडमध्ये रंगणार भक्तीचा सोहळा


बीड, 25 जून (हिं.स.)।

आषाढी वारीचे वेध लागताच अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. विठू नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि भगव्या पताक्यांच्या सावलीत संतांचा अथांग मेळा जेव्हा पंढरीच्या दिशेने कूच करतो, तेव्हा भक्तीचा एक अनोखा सोहळा डोळ्यांसमोर उभा राहतो. वारीचे हेच आध्यात्मिक महत्त्व, भक्तीचे मर्म आणि विठ्ठल नामाचा महिमा बीडमधील भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बीड शहरात एका भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.२६ जून पासून अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्यासह राज्यभरातील पाच नामांकित कथानिरुपणकार संगीतमय कथेतून आषाढी वारीचे महत्त्व भाविकांपुढे मांडणार आहेत.

येथील झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रवचनकार अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून पांडुरंग अष्टक या विशेष संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा ज्ञानयज्ञ शुक्रवार, दि. २६ ते ३० जून या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न होणार आहे. तसेच त्यानंतर दुपारी ३ ते ६ व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित पाच कथाकार, कीर्तनकार व प्रवचनकार हे भाविकांसमोर आषाढी वारीचे महत्व संत विचारांचे दाखले देऊन सांगणार आहेत. या कार्यक्रमासही भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. आषाढी वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि आस्थेची जीवनवाहिनी आहे. वारीच्या वाटेवर भाविकांच्या मनात विठ्ठल भक्तीची जी खरी ओढ निर्माण होते, त्याचाच अनुभव आता बीडकरांना घरबसल्या घेता येणार आहे. अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या रसाळ आणि सुश्राव्य निरूपणातून पांडुरंगाच्या विविध रूपांचा, संतांच्या चरित्राचा आणि 'पांडुरंग अष्टक' स्तोत्राचा महिमा संगीतमय पद्धतीने उलगडला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande