राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह 26 जून ते 2 जुलैदरम्यान
सोलापूर, 25 जून (हिं.स.)। राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “Engage, Educate & Empower People to Enhance Safety” या घोषवाक्याखाली 26 जून ते 2 जुलै या कालावधीत देशभर राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ता
mahavitran


सोलापूर, 25 जून (हिं.स.)।

राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने “Engage, Educate & Empower People to Enhance Safety” या घोषवाक्याखाली 26 जून ते 2 जुलै या कालावधीत देशभर राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आणि मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हा सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार आहे. विद्युत निरीक्षण विभाग, महावितरण, विद्युत ठेकेदार आणि उदवाहन (लिफ्ट) ठेकेदार यांच्या संयुक्त सहभागातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता है. ना. गांगुर्डे यांनी दिली.

या सप्ताहानिमित्त महानगरपालिका, जिल्हा परिषद, शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, महावितरण, महापारेषण आणि महाजनको यांनी विद्युत व उदवाहन सुरक्षेबाबत व्यापक जनजागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्युत अपघातांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.सप्ताहादरम्यान योग्य क्षमतेचा ELCB/RCCB बसविण्याचे महत्त्व, सुरक्षित विद्युत संचमांडणी व अर्थिंग, 3-पिन सॉकेटचा वापर, तात्पुरत्या व असुरक्षित वायरिंगचे धोके, लिफ्ट सुरक्षेचे नियम, तसेच शासनमान्य ठेकेदारांकडून विद्युत व उदवाहनाची कामे करून घेण्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.तसेच लिफ्टमधील ओव्हर स्पीड गव्हर्नर, एआरडी आणि इंटरलॉक यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करण्याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहात सर्व संबंधित विभाग, यंत्रणा आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती वाढवावी, असे आवाहन विद्युत निरीक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande