फडणवीस-ठाकरेंचा एकत्र विमानप्रवास; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई, 26 जून (हिं.स.)। राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका महत्त्वाच्या घटनेची भर पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून नागपूरकडे एकाच विमानाने प्रवास केल्याने राज्याच्
Fadnavis Thackeray Flight We Met Thats Big News CM


मुंबई, 26 जून (हिं.स.)। राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका महत्त्वाच्या घटनेची भर पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून नागपूरकडे एकाच विमानाने प्रवास केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसेच खासदार संजय राऊत हे देखील या विमानप्रवासात उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्या राजकीय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट ठरली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून ते यवतमाळसह फुटीर खासदारांच्या मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. याआधी त्यांनी ईशान्य मुंबईचा दौरा केला होता. आता ते संजय देशमुख आणि संजय जाधव यांच्या मतदारसंघात जाऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी बैठका आणि गाठीभेटी घेणार आहेत. हा दौरा पूर्वनियोजित असल्यामुळे ते मुंबईहून नागपूरकडे रवाना झाले. योगायोगाने त्याच विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपूरला जात होते.

विमान प्रवासा दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. या भेटीबाबत विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपण भेटलो, हीच मोठी बातमी आहे.” त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या भेटीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक लोक सार्वजनिक प्रवासाची सुविधा वापरतात. मुख्यमंत्री नियमितपणे नागपूरला जात असतात, तर उद्धव ठाकरेही त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी नागपूरला रवाना झाले होते. त्यामुळे दोघे एकाच विमानात प्रवास करणे ही केवळ योगायोगाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामागील कारणे देवेंद्र फडणवीस यांना चांगली माहिती असल्याने या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावणे योग्य ठरणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande