एचएएलमध्ये सुखोईच्या एक हजाराव्या इंजिनचे यशस्वी 'ओव्हरहॉल'
Successful overhaul Sukhoi 1000th engine HAL
Successful overhaul of


ओझर, 26 जून (हिं.स.)।

: येथील 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' (एचएएल) प्लांटमध्ये नुकतीच 'सुखोई'च्या १००० व्या इंजिनचे यशस्वी ओव्हरहॉल करण्यात आले. ओझर एचएएल प्लांट हा सुरुवातीपासूनच भारतीय हवाई दलाच्या 'सुखोई-३० एमकेआय' विमानांचा प्रमुख उत्पादन आणि देखभाल (ओव्हरहॉल) हब राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी ओझर प्लांटने सुखोई विमानांमध्ये वापरले जाणारे १००० वे 'रिपेअर्ड आणि ओव्हरहॉल' (आरओएच) केलेले 'एएल-३१ एफपी' इंजिन भारतीय हवाईदलाकडे यशस्वीरीत्या सुपूर्द करून एक मोठा टप्पा गाठला आहे.

एचएएलने गेल्या अनेक दशकांत मिग सिरीज, जॅग्वार, मिराज आणि हेलिकॉप्टर्स अशा अनेक प्रकारच्या विमानांच्या हजारो इंजिनांचे यशस्वी उत्पादन आणि देखभाल केली आहे.

त्यामुळे एचएएलच्या इतिहासात सर्व प्रकारची इंजिने मिळून हा आकडा अनेक हजारांच्या घरात जातो. त्यात आताचा हा १,००० चा माईलस्टोन फक्त 'एएल-३१एफपी' (सुखोईचे इंजिन) या एकाच मॉडेलचा आहे.

सुखोई-३० हे 'ट्टिन इंजिन' विमान आहे, म्हणजेच एका विमानाला दोन इंजिने लागतात. भारतीय हवाईदलाकडे सुमारे २६० सुखोई विमाने आहेत. म्हणजेच त्यांना एकाच वेळी किमान ५२० इंजिने लागतात आणि आपत्कालीन वापरासाठी अतिरिक्त इंजिने लागतात. या 'एएल-३१एफपी' इंजिनांना एका ठराविक उड्डाणांच्या तासांनंतर 58.200 (टेक्निकल लाइफ) संपूर्ण दुरुस्ती (ओव्हरहॉल) साठी कारखान्यात पाठवावे लागते. इंजिनचे भाग उघडून तपासणे आणि बदलणे याला ओव्हरहॉल म्हणतात. ही प्रक्रिया सातत्याने चालत असल्याने एकाच इंजिनवर त्याच्या जीवनकाळात अनेकदा ओव्हरहॉलची प्रक्रिया होते. त्यामुळेच सुखोईच्या इंजिनांच्या ओव्हरहॉलचा आकडा १,००० पर्यंत पोहोचला आहे. सुखोईसाठी १,००० व्या इंजिनाच्या ओव्हरहॉलने नाशिक 'एचएएल'च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande