उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा परिणाम होणार नाही; शिंदे गटाचीच शिवसेना वाढेल – उदय सामंत
अमरावती, 26 जून (हिं.स.)। शिवसेना (ठाकरे गट)चे सहा खासदार पक्षातून फुटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर येत असून नागपुरातून दौऱ्याची सुरुवात करून ते यवतमाळकडे रवा
उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा परिणाम होणार नाही; शिंदे गटाचीच शिवसेना वाढेल – मंत्री उदय सामंत


अमरावती, 26 जून (हिं.स.)। शिवसेना (ठाकरे गट)चे सहा खासदार पक्षातून फुटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर येत असून नागपुरातून दौऱ्याची सुरुवात करून ते यवतमाळकडे रवाना होणार आहेत. मात्र या दौऱ्याचा विदर्भातील राजकारणावर किंवा शिवसेनेच्या संघटनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना केला.

उदय सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हा दौरा यापूर्वी केला असता तर त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम झाला असता. मात्र आता पक्षातील मोठी फूट पडल्यानंतर आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर दौरे करून कोणताही फायदा होणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून घटक पक्षांमध्ये समन्वय उरलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वतःला मोठा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्यातच स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे विरोधकांकडे जनतेसमोर ठोस दिशा किंवा एकसंघ नेतृत्व नसल्याचे सामंत यांनी म्हटले. विदर्भातील शिवसेनेची ताकद वाढण्याबाबत बोलताना त्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच भविष्यात विदर्भात अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.दरम्यान, सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे विदर्भातील शिवसैनिकांशी संवाद साधून संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी दौरा करीत आहेत. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाकडून या दौऱ्याची प्रभावीता नाकारण्यात येत असून, दोन्ही गटांतील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिंदे गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना झटका; सर्व नियुक्त्यांना स्थगिती

शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पक्ष संघटनेत मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे विद्यमान जिल्हा पदाधिकाऱ्यांचे पद तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहे. पक्षाकडून पुढील ३० दिवसांच्या आत नव्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तोपर्यंत सर्व जिल्हाप्रमुख हे प्रभारी म्हणून कामकाज पाहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षाच्या नव्या संघटनात्मक रचनेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande