
नागपूर, 04 जून (हिं.स.) : जगाला नवी दिशा दाखविण्याची भारताची वेळ आली असताना काही शक्ती देशाला मागे नेण्यासाठी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यक्रमात उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया आणि वर्गाचे सर्वाधिकारी महेंद्र सिंह मग्गो उपस्थित होते.
या प्रसंगी 880 स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कसरतींचे सादरीकरण केले.
डॉ. भागवत म्हणाले की, भारताची संस्कारप्रधान परंपरा ही देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशविरोधी विचारसरणी असलेल्या काही घटकांना हे संस्कार बळकट होणे हितावह वाटत नाही. त्यामुळे समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी लहानसहान कारणांवरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले की, संघर्ष आणि स्वार्थाच्या राजकारणात अडकलेल्या जगाला भारताच्या विचारांवर आधारित नव्या मार्गाची गरज आहे. भारताने इतर देशांची केवळ नक्कल न करता स्वतःच्या मूल्यांवर आणि संस्कृतीवर आधारित विकासाचा मार्ग जगासमोर ठेवला पाहिजे.
जग शक्तीशाली राष्ट्राचेच ऐकते
जागतिक घडामोडींचा संदर्भ देताना डॉ. भागवत म्हणाले की, जगातील संघर्षांचा फटका इतर देशांनाही बसत आहे. शक्तिशाली राष्ट्रे आपले हित साधण्यासाठी युद्ध, निर्बंध किंवा आर्थिक दबावाचा वापर करतात. ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही, त्यांना शांत राहावे लागते. त्यामुळे भारताने सर्व क्षेत्रांत सक्षम आणि शक्तिशाली होणे आवश्यक आहे. भारत बलवान झाल्यास जग त्याचे विचारही ऐकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतिहासात नाव नसले तरी चालेल
संघाच्या कार्याचा उद्देश स्पष्ट करताना डॉ. भागवत म्हणाले की, देशाला पुढे नेणारा सक्षम आणि सुसंस्कृत समाज घडविणे हे संघाचे ध्येय आहे. भविष्यात भारत जगाच्या शिखरावर पोहोचला आणि त्या यशाचे श्रेय समाजाला मिळाले, तर संघाचे नाव इतिहासात नोंदले गेले नाही तरी हरकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी