लातूर - औसा शहरासह परिसरातील खडी केंद्रांवर महसूल विभागाचा दणका
लातूर, 04 जून (हिं.स.)। औसा शहरासह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खडी केंद्रांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत चार खडी केंद्रांना सील ठोकले आहे. तब्बल दोन वर्षांपासून नूतनीकरण परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आल्याने
महसूल प्रशासन कारवाई


लातूर, 04 जून (हिं.स.)। औसा शहरासह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खडी केंद्रांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत चार खडी केंद्रांना सील ठोकले आहे. तब्बल दोन वर्षांपासून नूतनीकरण परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या कारवाईत पीरमगजवाडी येथील काजी शेख, बुधोडा येथील दिलीप पवार, सेलू येथील विलास मांडे आणि अजय पाटील यांच्या खडी केंद्रांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे खडी केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली असून इतर केंद्रचालकांचेही धाबे दणाणले आहेत. औसा परिसरात गेल्या काही वर्षांत खडी केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या केंद्रांमुळे पर्यावरणीय समस्या, धूळप्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. दुसरीकडे खडी, खडीचुरा आणि बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले असतानाही काही केंद्रांकडून उत्पादन कमी दाखवून शासनाची रॉयल्टी चुकवली जात असल्याची चर्चा आहे.

परवान्याचे नूतनीकरण न करता व्यवसाय मात्र सुरू

दोन वर्षांपासून परवान्याचे नूतनीकरण न करता सुरू असलेल्या खडी केंद्रांवर महसूल विभागाने थेट सीलची कारवाई केल्याने नियमभंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, शहर आणि परिसरात अनेक मोठे खडी केंद्र व्यवसाय सुरू असून महसूल नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विकास बिरजदार व तलाठी दत्ता शिंदे यांनी संयुक्तपणे कारवाईचा बडगा उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महसूल विभागाची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत असून, या मोहिमेमुळे खडी व्यवसायातील अनियमिततेवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande