पैठणमध्ये अमोल अहिरे मृत्यू प्रकरण; कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, 4 जून (हिं.स.) : पैठण शहरात 17 वर्षीय अमोल अहिरे यांच्या मृत्यू प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकासह तिघांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पैठण प
पैठणमध्ये अमोल अहिरे मृत्यू प्रकरण; कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन


छत्रपती संभाजीनगर, 4 जून (हिं.स.) : पैठण शहरात 17 वर्षीय अमोल अहिरे यांच्या मृत्यू प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकासह तिघांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पैठण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

संबंधित आरोपींवर कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, मृतदेहासह नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

पोलिसांनी नगरसेवकासह तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमांचाही समावेश करण्यात आला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत निगराणी ठेवली जात आहे. प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande