
सोलापूर, 04 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार, 28 जून रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणार असून सोलापूर शहरातील 47 परीक्षा केंद्रांवर 28 हजार 298 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे नियोजन काटेकोरपणे करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत परीक्षा तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, कोषागार अधिकारी रणजित कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी किमान चार ते पाच भरारी पथके नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व 47 परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रश्नपत्रिका कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवून त्या प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिस संरक्षणाची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून अतिरिक्त 10 ते 15 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्याच्या सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिल्या.28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून त्यासाठी 12 हजार 261 परीक्षार्थी बसणार आहेत. तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून त्यासाठी 16 हजार 37 उमेदवार सहभागी होणार आहेत.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रशासनाकडून अंतिम तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड