
परभणी, 04 जून (हिं.स.)। आंबे व इतर फळे कॅल्शियम कार्बाइडसह घातक रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवली जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात जयसिंग शेळके, अनुप कान्हेकर, विनोद धापसे, गणेश शेवाळे, रवि लांडगे, संदीप पाजगे, सागर गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हाधिकारी, सेलू यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सेलू शहरात तसेच परिसरात आंबे व इतर फळे कॅल्शियम कार्बाइड आणि इतर घातक रसायनांच्या साहाय्याने पिकवली जात आहेत. अशा प्रकारे पिकविण्यात आलेल्या फळांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांमुळे तोंड येणे, उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. तसेच दीर्घकाळ अशा फळांचे सेवन केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. भारतीय अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून फळे पिकविण्यास बंदी असून हा दंडनीय गुन्हा आहे. असे असतानाही काही व्यापार्यांकडून या रसायनाचा सर्रास वापर होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी व नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.ं
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis