मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात प्रशासन सतर्क; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या गंभीर घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलसारख्या विषारी रसायनांच्या गैरवापराविरोधात व्यापक मोहीम हाती घ
Collctor


सोलापूर, 04 जून (हिं.स.)। पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या गंभीर घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलसारख्या विषारी रसायनांच्या गैरवापराविरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी सर्व संबंधित विभागांना संयुक्त आणि प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.मिथेनॉल हे इथेनॉलसारखे दिसणारे परंतु अत्यंत विषारी रसायन असून त्याच्या सेवनामुळे अंधत्व, कोमा, मूत्रपिंड निकामी होणे तसेच मृत्यू होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायनयुक्त दारू किंवा विनापरवाना विक्री होणाऱ्या ठिकाणांवरील मद्य सेवन टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमार्फत घंटागाड्यांच्या साहाय्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून विषारी मद्याचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. ग्रामीण भागातही विशेष जनजागृती सुरू करण्यात आली आहे.अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या अधिकृत अथवा अनधिकृत वीजजोडण्या तातडीने खंडित करण्यासाठी महावितरणला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने अवैध वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यावर भर दिला जाणार आहे.मिथेनॉलचे उदन, साठवणूक, खरेदी-विक्री आणि वितरण करणाऱ्या आस्थापनांवर विशेष देखरेख ठेवण्यात येत असून संशयास्पद व्यवहार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या गुळाच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. अवैध मद्यनिर्मितीसाठी त्याचा वापर होणार नाही यासाठी संबंधितांना आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाया संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून त्या आणखी तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांनी सहकार्य करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निष्काळजीपणा आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 मे ते 2 जून 2026 या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत 46 हजार 275 लिटर रसायन, 3 हजार 717 लिटर हातभट्टी दारू, 54.75 बल्क लिटर देशी दारू आणि 125 बल्क लिटर ताडी जप्त केली. या कारवाईदरम्यान 72 गुन्हे दाखल करण्यात आले असून 58 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच 3 वाहनांसह सुमारे 24 लाख 72 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande