
सोलापूर, 04 जून (हिं.स.) जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर (ता. माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी व्हॅन शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कॅन्सरचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेश माने यांनी महिलांची तपासणी केली, तर दंतरोग तज्ञ डॉ. किरण पोटे यांनी दंत तपासणीसह तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले.
तोंडाच्या कॅन्सर तपासणी अंतर्गत एकूण ११७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. स्तनाच्या कॅन्सर तपासणीसाठी ८६ महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणताही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तसेच गर्भाशयमुख (पिशवीच्या मुखाचा) कॅन्सर तपासणी अंतर्गत ८६ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८ संशयित रुग्ण आढळले असून २ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल आव्हाड, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. तंबाखू व गुटखा सेवन टाळल्यास तोंडाचा कॅन्सर रोखता येऊ शकतो. तसेच स्तन आणि गर्भाशयमुख कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड