मोजतबा खामेनेई यांची भेट घेणे आपल्यासाठी सन्मानाची बाब- ट्रम्प
वॉशिंग्टन , 05 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या रा
मोजतबा खामेनेई यांची भेट घेणे आपल्यासाठी सन्मानाची बाब- ट्रम्प


वॉशिंग्टन , 05 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमधून एखादा करार झाला, तर मोजतबा खामेनेई यांची भेट घेणे आपल्यासाठी सन्मानाची बाब असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले.

व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, “अशा कोणत्याही भेटीचे आयोजन अत्यंत सन्मानपूर्वक केले जाईल. मला भेट घेण्याची इच्छा नाही, पण जर ती घ्यावी लागली, तर मी त्यांचा आदर करेन. मात्र, जर आमच्यात एखादा करार झाला, तर त्यांची भेट घेणे शक्य आहे. त्याबाबत मला कोणतीही अडचण नाही.”

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, कोणतीही भेट झाली तर ती परस्पर आदराच्या वातावरणात होईल. त्यांनी खामेनेई यांना एक व्यावसायिक व्यक्ती म्हणून संबोधले आणि काही स्तरांवर त्यांची चांगली प्रतिष्ठा असल्याचेही नमूद केले. इराणी नेत्याबाबत केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले, “काही लोक त्यांच्याबद्दल वाईट बोलतात, पण अनेक लोक माझ्याबद्दलही वाईट बोलतात. त्यामुळे अशा सर्व गोष्टींना पूर्णपणे सत्य मानता येत नाही.”

अमेरिका-इराण कराराचा मुख्य मुद्दा म्हणजे इराणकडे कोणतीही अण्वस्त्रे नसावीत, असे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, गरज पडल्यास अमेरिका इराणच्या समृद्ध (संवर्धित) युरेनियम साठ्यावर नियंत्रण मिळवू शकते, असेही त्यांनी म्हटले. मात्र, सध्या अशा कारवाईची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने युरेनियम संवर्धनाची प्रक्रिया थांबवली असून अमेरिकेचे अधिकारी या सामग्रीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, हॉर्मुझ सामुद्रधुनी लवकरच जगासाठी पुन्हा खुली केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande