अमरावतीतील ५० कोचिंग क्लासेस विनापरवाना; २९ संस्थांना फायर ऑडिटसाठी नोटिसा
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) : लखनऊ येथे नुकत्याच घडलेल्या भीषण अग्नितांडवानंतर कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील कोचिंग क्लासेसचा आढावा घेतला असता, महापालिका हद्दीतील तब्बल
५० क्लासेसकडे नो परमीशन, २९ ला फायर ऑडीट नोटीस


अमरावती, 01 जुलै (हिं.स.) : लखनऊ येथे नुकत्याच घडलेल्या भीषण अग्नितांडवानंतर कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील कोचिंग क्लासेसचा आढावा घेतला असता, महापालिका हद्दीतील तब्बल ५० कोचिंग क्लासेसकडे बाजार परवाना विभागाचे अनुज्ञप्ती प्रमाणपत्र नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने २९ कोचिंग क्लासेसना फायर ऑडिट करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

महापालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर क्लासेस चालकांमध्ये खळबळ उडाली असून, या कारवाईला राजकीय वळण लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील अनेक कोचिंग क्लासेस हे व्यावसायिक संकुले आणि मॉलमध्ये सुरू आहेत. अशा व्यावसायिक इमारतींमधील क्लासेससाठी १८१.५० रुपये प्रति चौरस मीटर दराने फायर ऑडिट शुल्क आकारले जाते. संस्थांच्या मालकीच्या इमारतींमधील क्लासेससाठी हा दर १२१ रुपये प्रति चौरस मीटर असून, फायर ऑडिटचे वार्षिक नूतनीकरण करण्यासाठी १० रुपये प्रति चौरस मीटर शुल्क आकारण्याची तरतूद आहे.

सध्या शहरातील केवळ तीन ते चार मोठ्या व्यावसायिक इमारतींमधील कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट पूर्ण झाले असून, त्यांपैकी काहींना नूतनीकरणासाठीही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. बाजार परवाना मिळविण्यासाठी बांधकाम परवानगी आणि फायर ऑडिट अनिवार्य असून, त्यानंतर महापालिकेकडून वार्षिक ५ हजार रुपये शुल्क घेऊन परवाना दिला जातो. मात्र, सुमारे ५० क्लासेसनी या नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे.

यापूर्वीही तत्कालीन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विनापरवाना कोचिंग क्लासेसविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते. त्यावेळी काही संस्थांनी परवाने काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण पुढे सरकले नाही, अशी चर्चा आहे.

आता आयुक्त वर्षा लड्डा यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींनी महापौर श्रीचंद तेजवानी यांची भेट घेऊन सहकार्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यामुळे यंदा महापालिकेची कारवाई प्रत्यक्षात होणार की पुन्हा राजकीय हस्तक्षेपामुळे प्रकरण रखडणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पालकांकडून लाखो रुपयांची फी घेणाऱ्या अनेक कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याची टीका होत आहे. सुरत आणि लखनऊ येथील अग्नितांडवाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत अशाप्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande