
अमरावती, 01 जुलै (हिं.स.)
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील पूर्णा नदीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याने नदीतील सर्व मासे मरण पावले आहेत. नदीच्या काठावर मास्यांचा खच निर्माण झाला असून हे कृत्य कुणी केले याचीच चर्चा गावात आहे. खोलापूर कजबा येतील काही युवक आपली जनावरे नदीकाठी चारत होते. जनवारांना पाणी पिण्यासाठी त्यांनी नदीवर नेले असता त्यांना नदीत मरण पावलेल्या माश्यांचा खच दिसला. त्यामुळे त्यांनी आपले जनावरे घरी आणून पाणी पाजले व परिसरातील नागरिकांना त्याबद्दल माहिती दिली. नदीत कोणीही जनावरे पाणी पिण्यास घेऊन जाऊ नका, असा सल्ला त्यांनी गावातील नागरिकांना दिला. नदीत कोणी काय व कशासाठी टाकले याची चौकशी करण्याची मागणी खोलापूर कजबा येथील नागरिकांनी केली आहे. अज्ञात व्यक्तीने नदीच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने हजारो मासे मरण पावले असून काही जनावरांनी जर हे पाणी पिले तर त्यांना सुद्धा धोका होऊ शकता. या नदीवर पशु, पक्षी, गुरे ढोरे पाणी पिण्यासाठी येतात. तसेच नागरिक सुद्धा वापरण्याकरिता नदीचे पाणी घरी आणतात व जनवारांना सुद्धा पिण्यासाठी पाणी वापरतात. याबद्दल चौकशी करून हे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी