
- शाश्वत आणि भविष्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्थेवर देणार भर
- नवकल्पना, भागीदारी आणि शाश्वत विकासाची गरज अधोरेखित
नागपूर, 11 जुलै (हिं.स.) : ब्रिक्स देशांना शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सक्षम अशा परिवहन व्यवस्था निर्माण करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात शनिवारी आयोजित ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर गडकरी म्हणाले की, ब्रिक्स देशांची सामूहिक ताकद नवकल्पना, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक परिवहन व्यवस्थेच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकते. ही बैठक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील परिवहन सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गडकरींनी सांगितले.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती अशी असून ती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. हा दृष्टिकोन मानव-केंद्रित आणि मानवता सर्वोपरि या विचारसरणीला प्रोत्साहन देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या वेगवान प्रगतीचा उल्लेख परिवहन हे आर्थिक विकासाचा कणा असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, भारत रस्ते, रेल्वे, सागरी आणि विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे विकसित केले असून, नियंत्रित प्रवेश असलेल्या द्रुतगती महामार्गांसह बहुआयामी संपर्क व्यवस्थेचा विस्तार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिका, सोनमर्ग बोगदा आणि 10 हजार किलोमीटरपेक्षा अधिक ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या योजना पायाभूत सुविधा विकासाला पर्यावरणीय शाश्वतता आणि तांत्रिक नवकल्पनांशी जोडतात.
रेल्वे आणि सागरी क्षेत्रातील आधुनिकीकरणावर भर
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारताच्या ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे जवळपास पूर्ण विद्युतीकरण झाले आहे. वंदे भारत सेवांचा विस्तार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची प्रगती आणि नवीन पंबन पुलासारखे प्रकल्प हे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. सागरी पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स क्षमता वाढविण्यासाठी मेरीटाइम अमृत काल व्हिजन 2047, ई-नाविक, ई-समुद्र आणि हरित नौवहन उपक्रम यांसारख्या योजनांची माहिती त्यांनी दिली.
हरित आणि स्मार्ट परिवहनासाठी भारताची बांधिलकी
गडकरी यांनी इलेक्ट्रिक बसेस, ग्रीन अर्बन मोबिलिटी योजना आणि प्रादेशिक हवाई संपर्क सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उडान योजनेच्या यशाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन मुळे पायाभूत सुविधा नियोजनामध्ये मोठा बदल झाला असून, एकात्मिक बहुआयामी विकासामुळे लॉजिस्टिक्स खर्च कमी झाला आहे आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग मिळाला आहे.
रस्ता सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा आणि शाश्वत विकास हे भारताच्या परिवहन धोरणाचे प्रमुख आधार आहेत.रस्ता अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली पीएम-राहत योजना तसेच रस्ते बांधकामात पुनर्वापर केलेले प्लास्टिक, नगरपालिका कचरा, फ्लाय ॲश, स्टील स्लॅग, बांबू क्रॅश बॅरिअर आणि जुन्या टायरांचा वापर यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी पर्यावरणपूरक पायाभूत विकासाचे उदाहरण म्हणून उल्लेख केला.
जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्याचे आवाहन
गडकरी यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा वित्तपुरवठा, वाहतूक कोंडी, उत्सर्जन नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत संपर्क यांसारख्या सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, पर्यायी इंधन, डिजिटल परिवहन प्रणाली आणि शाश्वत मल्टीमॉडल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात ज्ञानविनिमय, क्षमता विकास, तांत्रिक सहकार्य आणि संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देण्याची भारताची तयारी त्यांनी व्यक्त केली.
शाश्वत परिवहनाचे भविष्य घडविण्याचा निर्धार
बैठकीच्या निष्कर्षांबाबत विश्वास व्यक्त करत गडकरी यांनी सांगितले की, ब्रिक्स परिवहन सहकार्यामुळे व्यावहारिक, नाविन्यपूर्ण आणि लोककेंद्रित परिवहन उपाययोजना विकसित करण्यास मदत होईल.समावेशक विकासाला चालना देण्यासाठी, प्रादेशिक संपर्क मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करत सर्वांसाठी अधिक शाश्वत व समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी