



- विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रभामंडळ सोहळ्याचे विशेष आकर्षण
मुंबई, 11 जुलै (हिं.स.) - पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवेघाटचा अवघड टप्पा पार करत सासवडकडे मार्गस्थ झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवेघाटात वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीभाव पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने दिवेघाटाची चढाई पूर्ण करून घाटाच्या वरच्या टप्प्यात पोहोचली. त्याआधी सकाळपासूनच पालखीसोबत असलेल्या अनेक दिंड्या दिवेघाट परिसरात दाखल झाल्या होत्या. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे आणि टाळ मृदंगाच्या नादात संपूर्ण दिवेघाट परिसर भक्तीत न्हाऊन गेला आहे. दिवेघाटाचा मार्ग हा वारीतील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक मानला जातो. मात्र, विठ्ठलनामाचा गजर करत वारकरी हा टप्पा मोठ्या उत्साहाने पार करत आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर दिवेघाट परिसर पुन्हा एकदा लाखो वारकरी आणि त्या नेत्रदीपक-नयनरम्य दिव्य सोहळ्याची छायाचित्रे टिपण्यासाठी छायाचित्रकार आणि वारीप्रेमी मोठ्या संख्येने जमा झाले होते. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या घाटातील दिंडी अधिकच खुलून दिसत होती. याच वेळी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अगदी वर सूर्याभोवती तयार झालेल्या प्रकाशाच्या वर्तुळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दिवे घाटात विठ्ठलाच्या मूर्तीवर दिसलेल्या या प्रभामंडळाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक वारकरी, छायाचित्रकार आणि नागरिकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यामुळे पालखीतील दिंडींच्या देखण्या छायाचित्रांसोबतच हे प्रभामंडळही यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. हे दृश्य पाहून अनेकांनी ते इंद्रधनुष्य, इंद्रवज्र किंवा अन्य नैसर्गिक घटना असल्याचे सांगितले. मात्र हवामान शास्त्राच्या भाषेत या घटनेला ‘प्रभामंडळ’ किंवा ‘खळे’ असे म्हटले जाते. सूर्याभोवती असे वर्तुळ दिसणे तुलनेने दुर्मिळ मानले जाते.
पालखी सोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते. त्यामुळे दिवे घाटातील हा निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम यंदाच्या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण ठरला.
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली होती. शनिवारवाडा, लाल महाल परिसर, लक्ष्मी रोड, तुळशी बाग, कसबा पेठ, मंडई तसेच शनिवार पेठ परिसरात दिवसभर वारकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेट देतानाच अनेक वारकऱ्यांनी खरेदीचाही आनंद लुटला.
यंदाच्या वारीने पुणे शहराला भक्ती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी दिली असून बाजारपेठांपासून ऐतिहासिक वास्तूंपर्यंत सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान दरवर्षी पावसाची हजेरी लागते. मात्र यंदा पालखी पुण्यात मुक्कामी असताना पावसाने विश्रांती घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी