अंबाजोगाई येथे एक हजार मुलांना स्कूल कीट वाटप..
बीड, 20 जुलै (हिं.स.): समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केले. येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीचा उपक्रम, विद्यार्थी विकास यो
मुलांना किट वाटप


बीड, 20 जुलै (हिं.स.): समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केले.

येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीचा उपक्रम, विद्यार्थी विकास योजना व पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एक हजार मुलांना शैक्षणिक साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी जितीन रहमान बोलत होते. अध्यक्षस्थानी ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रविंद्र कर्वे हे होते. विद्यार्थी विकास योजनेचे अध्यक्ष संजीव करंदीकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस आधिकारी ऋषिकेश शिंदे, रुई रामेश्वर येथील दादाराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यकारी संचालक आशा बालासाहेब कराड, पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाचे, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सौरभ उबाळे, पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे प्रा.रमेश पंडित, वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्रा.सौरभ जोशी, ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदी, वकील संघाचे अध्यक्ष अशोक कवडे होती, ह्रदयरोग तज्ज्ञ डाॅ. दिपक कटारे, आई हाॅस्पीटलच्या संचालिका डाॅ. सुनिता तोंडगे, प्रताप भिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली

बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. कष्ट हीच माझी प्रेरणा आहे. शिक्षणातही कष्ट केले तरच पुढे जाता येते त्यामुळे समाजाचे चित्र बदलायचे असेल तर हिच प्रेरणा घेऊन पुढे गेले पाहिजे. त्यासाठी शिस्त अंगिकारून माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपापल्या क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे असे आवाहनही जितिन रहमान यांनी केले.

स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, मदतीची भावना ठेवा असे आवाहन ऋषिकेश शिंदे यांनी केले. आपल्याला मिळालेल्या स्कूल कीटच्या माध्यमातून केलेली मदत ही आशेची आणि विश्वासाची आहे. हा विश्वास घेऊन हे विद्यार्थी पुढे जातील. स्वप्न बघायला श्रीमंतीच असावी लागते असे नाही. गरिबीचा विचार न करता, मेहनत व प्रामाणिकपणे प्रयत्न करा, मोठे झाल्यानंतर मातेला व गावच्या मातीला विसरू नका अशी अपेक्षा संजीव करंदीकर यांनी व्यक्त केली. प्रज्ञा दिदी यांनी या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० विद्यार्थ्यांना स्कूल कीट वाटप झाले. विद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन गुणगौरव झाला. लाभधारक विद्यार्थी व मातांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी केले. प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत सर्व स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande