
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाने या शिबिरांच्या नियोजनास सुरुवात केली असून, नागरिकांना विविध आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत उमरगा-लोहारा, तुळजापूर,धाराशिव-कळंब आणि भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजित तारखांनुसार शिबिरे भरविण्यात येणार आहेत.त्यानुसार २२ जुलै रोजी आदर्श महाविद्यालय, उमरगा,२४ जुलै रोजी शिव प्रतिष्ठान मंगल कार्यालय,तुळजापूर,२७ जुलै रोजी ओम साई मंगल कार्यालय,शिराढोण (ता.कळंब) आणि २ ऑगस्ट रोजी रामहरी मंगल कार्यालय,भूम येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिबिरांमध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी व कार्ड वितरण, आभा (ABHA) कार्ड नोंदणी व वितरण, उच्च रक्तदाब,मधुमेह,कर्करोग आदी असंसर्गजन्य आजारांची तपासणी, संसर्गजन्य रोग तपासणी,रक्तदान शिबिर तसेच माता-बाल आरोग्य,प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व अन्य विभागांशी समन्वय साधून शिबिरांचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.नियोजित वेळापत्रकानुसार आरोग्य विभागाने सक्रिय सहभाग नोंदवून शिबिरे यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis