मोशीतील सुरक्षा, पर्यावरण आणि कचरा डेपोचा प्रश्न; महापौरांच्या पुढाकाराने उच्चस्तरीय बैठक
पुणे, 21 जुलै (हिं.स.)। मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकाराने मोशी ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्
Mdjd


पुणे, 21 जुलै (हिं.स.)। मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकाराने मोशी ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत दुर्घटनाग्रस्तांना न्याय, दोषींवर कठोर कारवाई तसेच मोशीतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर निर्माण झालेली भीती, परिसरातील सुरक्षिततेचे प्रश्न, कचरा डेपोमुळे होणारे आरोग्य व पर्यावरणीय दुष्परिणाम आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षितता, पर्यावरण आणि प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

बैठकीत ग्रामस्थांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन व महापालिकेने उचलावा आणि पीडित कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय किंवा महापालिका सेवेत नोकरी देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, मोशी कचरा डेपोबाबत कायमस्वरूपी निर्णय घेऊन परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व प्रलंबित नागरी सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावावे, अशीही मागणी करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे पाठपुरावा केला जाईल, असे सांगत दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि मोशीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande