संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा गोंधळ
लोकसभा-राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारीही विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत पार पडू शकले नाही. सततच्या घोषणाबाजी आणि ग
लोकसभेचे प्रतिकात्मक छायाचित्र


लोकसभा-राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारीही विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत पार पडू शकले नाही. सततच्या घोषणाबाजी आणि गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज प्रथम दोन वेळा अल्पावधीसाठी तहकूब करण्यात आले, तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये बदल दिसून आला. पहिल्या दिवशी उपस्थित करण्यात आलेला श्रीराम मंदिरातील देणगी चोरीचा मुद्दा मागे पडला असून, त्याऐवजी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार ठप्प झाले.

सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी २ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी सदस्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुन्हा घोषणाबाजी केली. अखेर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. तर लोकसभेत काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही जोरदार गदारोळ केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन नीट पेपरफुटी प्रकरणावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली.

सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, विरोधकांना नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार या विषयांवर सभागृहात चर्चा हवी आहे. सरकार या विषयांवर चर्चा टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांवर सरकारकडून तत्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande