
नांदेड, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै २०२६, बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता माहूर येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टेनलेस स्टीलच्या १० खुर्च्या व १० टेबल यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्य बापू देशमुख यांच्या पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयजी कोडगे, आमदार भीमराव केराम तसेच जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या विकासाबरोबरच धार्मिक स्थळांचा विकास, भाविकांच्या सोयी-सुविधा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी सातत्याने विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याच्या संकल्पनेतून माहूरच्या श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
मंदिर परिसरात उपलब्ध होणाऱ्या या खुर्च्या व टेबलांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, भक्तसेवेचा हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनकल्याणाच्या विचारांना साजेसा ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जगदंबा देवीचे भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis