
रायगड, 21 जुलै (हिं.स.)। : कारगील विजय दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कारगील युद्धातील शूरवीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर माता आणि वीर पत्नी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत नारायण फाटक यांनी केले आहे.
दरवर्षी २६ जुलै रोजी कारगील विजय दिन साजरा करून १९९९ च्या कारगील युद्धात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांना आदरांजली वाहिली जाते. त्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहून वीर जवानांच्या शौर्याला सामूहिक मानवंदना अर्पण करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
कार्यक्रमाद्वारे देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार असून, देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेशही दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)