
परभणी, 21 जुलै (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिंतूर तालुक्यातील सन 2026 मध्ये मुदत संपणार्या 101 ग्रामपंचायतींसाठी 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार 15 एप्रिल 2026 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक निश्रि्चत करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 24 ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदारांना हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांवर कार्यवाही केल्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिंतूर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयांच्या सूचना फलकावर 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीबाबतच्या हरकती व सूचना तहसील कार्यालय, जिंतूर येथे कार्यालयीन वेळेत 24 ते 29 जुलैदरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हरकती अथवा आक्षेप नमुना ‘अ’ आणि नमुना ‘ब’ मध्येच आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे संबंधित मतदारांनी प्रारूप मतदार यादीची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत हरकती किंवा सूचना दाखल कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी आणि तहसीलदार शितल कच्छवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis