रत्नागिरी : पृथ्वीचे संवर्धन-संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची - प्रा. डी. आर. वालावलकर
रत्नागिरी, 21 जुलै, (हिं.स.) । पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वसुंधरा जिज्ञासा मंडळाच
वसुंधरा जिज्ञासा मंडळ उद्घाटन


रत्नागिरी, 21 जुलै, (हिं.स.) । पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ प्रा. डी. आर. वालावलकर यांनी केले.

अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या विविध क्षेत्रभेटीत उत्स्फूर्त सहभागी होऊन अधिकाधिक ज्ञान संपादन करावे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, व्याख्याते गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे सचिन सनगरे आणि कला विभाग प्रमुख वैभव कानिटकर उपस्थित होते. सुरवातीला प्रा. गोसावी यांनी पृथ्वीगोलास पुष्पहार अर्पण केला.

वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय माळवदे यांनी येत्या वर्षभरात मंडळामार्फत भूगोल विषयावरील हस्तलिखित, मॅप कॉम्पिटिशन, क्षेत्रभेटी ,सहल परिसंवाद व विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. उपप्राचार्य प्रा. गोसावी यांनी भूगोल अभ्यासाची गरज आणि भूगोलातील करिअरच्या संधी याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. वैभव कानिटकर यांनी स्पर्धा परीक्षेतील भूगोल विषयाचे महत्त्व सांगितले.

प्रा. सचिन सनगरे यांनी लोकसंख्या वाढ व तिचे दुष्परिणाम, उपलब्ध संसाधनावर येणारा ताण कसा कमी करता येईल, तसेच शाश्वत विकासाविषयी अनेक उदाहरणे देऊन आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात विविध प्रश्न विचारून जिज्ञासा व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande