
सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे कट्टर आणि पूर्णवेळ कार्यकर्ते प्रमोद कदम यांच्या एन. जी. मिल चाळ येथील निवासस्थानी रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे श्रवण केले. निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने चाळीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदारांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमानिमित्त भाजपातर्फे विविध बूथवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे हे नियमितपणे या कार्यक्रमाला उपस्थित राहत असून, यावेळी त्यांनी बूथ क्रमांक ७ चे बूथप्रमुख व पूर्णवेळ भाजप कार्यकर्ते प्रमोद कदम यांच्या घरी भेट देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एन. जी. मिल चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदार कोठे यांनी रवींद्र तळीखेडे, चाळीचे सचिव भारत दुर्गे आणि शाहू सलगर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चहापान केले व नागरिकांशी संवाद साधला. आमदार देवेंद्र कोठे आपल्या घरी 'मन की बात' कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती अचानक मिळताच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद कदम भावूक झाले. त्यांनी आनंदाने आमदार आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत केले. दरम्यान, आमदार कोठे यांनी बूथ क्रमांक ७ वरील कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनाचे कौतुक करत कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कामाचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड