महसूल समाधान शिबीर अभियानातून नागरिकांना २९ शासकीय सेवा एकाच छताखाली – अपर जिल्हाधिकारी
मुंबई, 26 जुलै (हिं.स.)। : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ''छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर'' अभियान र
मुंबई


मुंबई, 26 जुलै (हिं.स.)। : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियान राबविण्यात येत असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई शहराचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत 'एकाच छताखाली' पोहोचविण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध महसुली दाखले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा आदींसह एकूण २९ सेवा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी १९ स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

यावेळी धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी धारावीतील कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात व आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १०९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी अजित नैराळे,जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande