बीड : पाटोदा आगारात 'राजमाता जिजाऊ'च्या पाच नव्या बस दाखल
बीड, 26 जुलै (हिं.स.)। आ. सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून पाटोदा आगाराला ''राजमाता जिजाऊ'' मालिकेतील ५५ आसनी पाच अत्याधुनिक एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या बसमुळे पाटोदा आगाराच्या ताफ्यात भर पडली असून विशेषतः लांब
आमदार सुरेश धस


बीड, 26 जुलै (हिं.स.)। आ. सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून पाटोदा आगाराला 'राजमाता जिजाऊ' मालिकेतील ५५ आसनी पाच अत्याधुनिक एसटी बस उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या बसमुळे पाटोदा आगाराच्या ताफ्यात भर पडली असून विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर होणार आहे.

पुणे येथील एसटी महामंडळाच्या मुख्य विभागीय कार्यालयातून या पाच बस पाटोद्याकडे रवाना करण्यात आल्या. याबाबतची माहिती आगार व्यवस्थापक तथा आगार प्रमुख संतोष डोके यांनी दिली. पाटोदा आगारात यापूर्वी ४८ बस कार्यरत होत्या. बीड जिल्ह्यातील इतर आगारांच्या तुलनेत पाटोदा आगाराचे उत्पन्न समाधानकारक असल्याने नवीन बसची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यापूर्वीही आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांतून नवीन बस उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार करून आमदार धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत पाटोदा आगारासाठी पाच नवीन 'राजमाता जिजाऊ' बस मंजूर करण्यात आल्या. या बस आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून त्यामध्ये ५५ आरामदायी आसने, आकर्षक अंतर्गत रचना, अधिक प्रशस्त लेगस्पेस, सुधारित सस्पेन्शन प्रणाली, प्रभावी वातानुकूलित वायुवीजन व्यवस्था, एलईडी प्रकाशयोजना, मजबूत सुरक्षा प्रणाली आणि इंधन बचत करणारे आधुनिक इंजिन अशी वैशिष्ट्ये आहेत. या नव्या बसमुळे पाटोदा आगाराच्या सेवाक्षमतेत वाढ होणार असून लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी नागरिकांनी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन आगार प्रमुख संतोष डोके यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande