रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी
सोलापूर, 26 जुलै, (हिं.स.)। भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रेबीजमुळे पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कुटुंबाला आर्
Ksk


सोलापूर, 26 जुलै, (हिं.स.)। भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रेबीजमुळे पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच घटनेची चौकशी व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

घटनेनंतर स्थानिक नगरसेवक राजकुमार पाटील यांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री, महापालिका प्रशासन तसेच आमदार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी एमएच १३ न्यूजशी बोलताना दिली.

याशिवाय, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात येणार असून, संबंधित वैद्यकीय अधिकारी व विभागाकडून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे राजकुमार पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शहर आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या परिसरात कार्यरत असून, समर्थ स्वामीचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला.

स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात जमलेल्या काही कुत्र्यांमध्ये भांडण सुरू असताना तेथे खेळत असलेल्या समर्थवर अचानक कुत्र्यांनी धाव घेतली. त्यावेळी एका कुत्र्याने त्याला चावा घेतल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. तसेच चाव्यामुळे झालेल्या जखमेवर कुत्र्याने चाटल्याने रेबीजचा विषाणू शरीरात प्रवेश झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत द्यावी तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande