दापोलीमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपये मंजूर
मुंबई, 26 जुलै (हिं.स.) विकासाला गती, जनसेवेला प्राधान्य आणि युवा सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी त्रिसूत्री मांडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ''शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे'' अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.
दापोलीमधील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपये मंजूर


मुंबई, 26 जुलै (हिं.स.)

विकासाला गती, जनसेवेला प्राधान्य आणि युवा सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी त्रिसूत्री मांडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे' अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलताना त्यांनी महायुती सरकारचा केंद्रबिंदू सत्ता नसून सर्वसामान्यांचा विकास असल्याचे स्पष्ट केले.

शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शासन आपल्या दारीनंतर आता शिवसेना जनतेच्या दारी हे अभियान जनसेवेचे नवे पर्व ठरेल, असे सांगत त्यांनी एका दिवसात २० हजारांहून अधिक नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.

युवकांना उद्देशून बोलताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), चॅटजीपीटी, स्टार्टअप, इनोव्हेशन आणि ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले. आकाशाला गवसणी घाला; पण पाय जमिनीवर ठेवा. आंदोलनाची ताकद जशी तुमच्यात आहे, तशीच नव्या कल्पना साकारण्याची क्षमता देखील विकसित करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

२०२२ च्या राजकीय घडामोडींनंतर जनतेने शिवसेनेच्या कामावर शिक्कामोर्तब केल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय हेच आमचे खरे राजकारण आहे.

शिवसेना ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून वर्षभर जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पूर, वादळ किंवा कोणतेही संकट असो, शिवसैनिक सर्वप्रथम मदतीसाठी पोहोचतात, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे विशेष कौतुक केले. रामदास कदम म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ, हिंदुत्वाचा हुंकार आणि भगव्याचा बुलंद आवाज आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी निष्ठा राखत त्यांनी जनतेसाठी सातत्याने संघर्ष केला आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांचा गौरव केला. दापोली येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींच्या निधीची मागणी त्यांनी केली होती, ती तात्काळ मंजूर करून शासन निर्णय (जीआर) मंचावरच त्यांच्या हस्ते सुपूर्द करत लोकाभिमुख काम करणाऱ्या नेतृत्वाला सरकार नेहमीच बळ देत राहील, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. सलग तिसऱ्या वर्षी हा लोकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एका दिवसात २० हजारांहून अधिक नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि विविध शासकीय दाखल्यांचे थेट वितरण, तसेच २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा लोकसेवेचा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची सिद्धेश कदम यांची कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, राज्यभर अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ४५० कोटींच्या स्वच्छता यंत्रसामग्रीचा उपक्रम, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि राज्यभर 'शिवसेना जनतेच्या दारी' अभियान राबविण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

जनतेचा विश्वास हीच आमची ताकद आहे. विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण या त्रिसूत्रीवरच महाराष्ट्राची उज्ज्वल वाटचाल घडणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित या भव्य सोहळ्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश कदम, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार रवींद्र वायकर, आमदार मनीषा कायंदे, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, मनीषा वायकर, वैभव भरडकर, संजय कदम, अमेय घोले, सुशांत शेलार स्वप्नील टेंबविलकर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी लाडक्या बहिणी लाडके भाऊ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande