विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटणे म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना';  शिंदेंचा हल्ला
मुंबई, 26 जुलै (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडला, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटणे म्हणजे 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना';  शिंदेंचा हल्ला


मुंबई, 26 जुलै (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडला, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर दादरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने केलेल्या जल्लोषावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जोरदार प्रतिहल्ला चढवत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबईमध्ये नेस्को सेंटर येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे म्हणाले, नीट पेपर लीक ही देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला. दोषींना दहा वर्षांची सक्त शिक्षा, दहा कोटी रुपयांपर्यंत दंड, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले आणि कोणालाही अभय नाही, ही मोदी सरकारची स्पष्ट भूमिका आहे.

त्यांनी सांगितले की, एनटीएमधील सुमारे ४७ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना अटक झाली असून सीबीआय चौकशी सुरू आहे. कोणालाही सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पंतप्रधानांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, ही लोकशाहीतील जबाबदार भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, आंदोलन जंतर-मंतरवर सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हजारो लोकांना घेऊन जाण्याचा उद्देश काय होता?

स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायदा करण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती आंदोलनास बंदी आहे, हे विरोधी पक्षनेत्याला माहिती असतानाही जाणीवपूर्वक तेथे गर्दी जमवण्यात आली. हा निषेध नव्हता, तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशांप्रमाणे भारतातही अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र देशातील जनतेने तो पूर्णपणे उधळून लावला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातून काही नेते विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन 'आग लागली आहे... ती विझू देऊ नका' अशी भडकाऊ भाषा करत होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारण मिसळून राज्यात पेटवापेटवी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आधीच नाकारले आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांचे राजकारण फेटाळून लावले. आंदोलन संपताच त्यांचा संपूर्ण राजकीय अजेंडा कोसळला, असा घणाघात त्यांनी केला.

विरोधकांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, आंदोलन संपले, पण त्यावर राजकीय दुकान मांडणाऱ्यांचा हिरमोड झाला. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी त्यांची अवस्था झाली आहे.

शिंदे म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठामपणे उभे आहेत. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, देश घडवावा आणि कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या व्यासपीठाचा वापर करू देऊ नये.

विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या भावनांवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला; पण मोदी सरकारने कृतीतून न्याय दिला. त्यामुळे विजय विद्यार्थ्यांचा झाला आणि पराभव राजकारण करणाऱ्यांचा, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande