
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। अहमदपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला यश आले आहे. गुप्त बातमीदाराच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या साहाय्याने पोलिसांनी अवघ्या १३ दिवसांच्या आत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश दीपकराव डहाळे (वय ३०, व्यवसाय: कारागीर, रा. भोई गल्ली, अहमदपूर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी रात्री २३.०० ते ११ जुलै २०२६ रोजी पहाटे ०३.०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्याने अडीच तोळ्याचे जुने वापरते चांदीचे ब्रेसलेट, लहान मुलाच्या हातातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची मनगटी, एक हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ४२ हजार २५० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४६८, ३३१(४), ३०५(अ) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. यादरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून आरोपी समीर अहमद अली सय्यद (वय २५, रा. बिस्ती गल्ली, अहमदपूर) यास दिनांक २४ जुलै रोजी जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपीने घरफोडीची कबुली दिली असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात चोरीला गेलेला सॅमसंग गॅलक्सी ए ५६ कंपनीचा मोबाईल आरोपीकडे मिळून आला नाही, बाकी सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तय्यब शेख हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis