
कोल्हापूर, 27 जुलै (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात सन ३ जानेवारी २०१८ साली भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या आंदोलकाच्या बाबतीत सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली .
या दंगलीतील संशयित आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली. ते म्हणाले , पोलीस विभागाने याबाबत वस्तुनिष्ठ कार्यवाहीच्या अनुषंगाने अहवाल तयार करावा तसेच याबाबतची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करावी असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले .
जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांनी नियमानुसार जे प्रस्ताव पात्र होत असतील असे सर्व प्रस्ताव 15 ऑगस्ट पूर्वी प्रशासनाकडे सादर करावेत. प्रशासन हे सर्व प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करेल. तर या दंगलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आठ गुन्ह्यांची नोंद झाली असून यातील दोन गुन्हे मागे घेण्यात आले आहेत तर एका गुन्ह्यात संबंधिताची निर्दोष मुक्तता झाली असून सद्यस्थितीत केवळ पाचच गुन्हे दाखल असल्याची माहिती करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी दिली.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव , प्रांताधिकारी दीपक शिंदे ,मोसमी चौगुले, प्रसाद चौगुले , सरकारी वकील सूर्यकांत पवार , शहाजी कांबळे ,डी .जे भास्कर तर दूरदृष्टी प्रणाली द्वारे जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच इतर भीम अनुयायी उपस्थित होते .
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar