शहापूर भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहाराचे आरोप निराधार- एसडीओ मुकेश चव्हाण
अलिबाग, 27 जुलै (हिं.स.) :मौजे शहापूर (ता. अलिबाग) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या वृत्तांचे अलिबागचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मुकेश चव्हाण यांनी खंडन केले आहे. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया महाराष
Allegations-regarding-land-acq


अलिबाग, 27 जुलै (हिं.स.) :मौजे शहापूर (ता. अलिबाग) येथील औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या वृत्तांचे अलिबागचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मुकेश चव्हाण यांनी खंडन केले आहे. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने राबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित जमिनीच्या संपादनासाठी २३ एप्रिल २०२३ रोजी कलम ३२(१) अंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी ७/१२ उताऱ्यावर नोंद असलेल्या मूळ खातेदारांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या. उच्चाधिकार समितीने निश्चित केलेल्या नुकसानभरपाई दरानुसार पात्र खातेदारांना जून २०२५ मध्ये कायदेशीर प्रक्रियेद्वारे मोबदला अदा करण्यात आला.

दरम्यान, अंतिम निवाड्याच्या वेळी ७/१२ उताऱ्यावर फेरफार क्रमांक १२७९७ द्वारे किशोर शाह यांचे नाव नोंदविण्यात आल्याचे आढळून आले. मात्र, कलम ३२(१) ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जमिनीच्या नोंदीत फेरबदल करण्यास कायद्यानुसार मनाई असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

संबंधित फेरफार नोंद यापूर्वी चार वेळा नामंजूर करण्यात आली होती. त्यानंतरही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ती मंजूर केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच सदर फेरफार नोंद रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

किशोर शाह यांनी केलेले आरोप आणि दाखल केलेली तक्रार ही दिवाणी स्वरूपाच्या वादाशी संबंधित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच शासनाची दिशाभूल करून नुकसानभरपाई घेतल्याचा संशय असलेल्या संबंधित लाभार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा सरकारी वकिलांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.

भूसंपादन प्रक्रियेतील सर्व टप्पे कायद्यानुसार पार पडले असून, गैरव्यवहारासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत आणि निराधार असल्याचा पुनरुच्चार उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केला आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande