
बीड, 27 जुलै (हिं.स.) :बीड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी काही रिक्षा ताब्यात घेत चालकांना ड्रेस कोड वापरण्यासह प्रवाशांशी शिस्तीने वागण्याचे निर्देश दिले आहेत.
रिक्षा चालकांनी गणवेश (ड्रेस कोड) परिधान करणे, बॅच-बिल्ला लावणे आणि महिला व मुलींशी सभ्य व शिस्तबद्ध पद्धतीने संवाद साधणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बीड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही रिक्षांची तपासणी करून त्या ताब्यात घेण्यात आल्या. यावेळी चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ज्या रिक्षांवर दंड प्रलंबित आहे किंवा ज्यांची आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, अशा वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis